Monday, August 16, 2010

पोळा/ बैलपोळा

श्रावण वद्य अमावस्येला हा सण साजरा केला जातो. या सणाला शेतकरी लोकांमध्ये खूप महत्व आहे. शेतकरी या दिवशी बैलांना तेल लावुन आंघोळ घालतात, त्यांना सजवुन औक्षण केले जाते, दुपारी पुरणपोळीचे जेवण करुन ते बैलांना खाऊ घालतात.तसेच त्यांची वाजतगाजात मिरवणुक काढली जाते.  शेतीमध्ये बैलांची होणारी मदत अमुल्य आहे, आपल्यासाठी सदैव कष्ट करणाऱ्या या मुक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण उत्साहात साजरा केला जातो.
काही ठिकाणी बैलगाड्यांच्या शर्यती देखील आयोजित केल्या जातात. पण मला कळालेल्या माहिती मध्ये एक गोष्ट इथे नक्की सांगावी वाटते, या शर्यतींच्या वेळी बैलांना दारु पाजली जाते, जेणेकरुन ते आवेषाने पळतील. परंतु ज्याची आपण पूजा करतो त्याच्या जिवाशी केवळ बक्षिसाच्या रकमेसाठी का खेळायचं? कधी ते प्राणांवर देखील बेतु शकतं? मग दोष कोणालाही देता येणार नाही.
या बद्दल तुमच्या  प्रतिक्रिया जाणायला मला नक्की आवडेल.तर मी वाट बघतीय.....

2 comments:

  1. पोळ्याच्या आधल्या दिवशी बैलांना "निमंत्रण" दिल्या जाते कि आमच्या कडे "ठोम्बरा" (पोळ्याच्या दिवशीच बैलांच मानाच खाद्य) खायला या. हे मानाच निमंत्रण द्यायला स्वतः मालक त्याच्या गाड्यांसोबत ठराविक घरी जातो. जातांना बैलांची गळ्यातील घंटा वाजवत जाण्याची प्रथा आहे.

    पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घातली जाते. बैलांशी निगडीत वस्तू जसे बैलांचे दोर, मुसक्या, नाथ घंटा इत्यादी नवीन आणून बैलांवर चढवतात. शिंग तासून रंग देतात. काही वेळी बैलांना सुद्धा रंग देण्याची प्रथा आहे. दिवस भर बैलांना कणकेचे गोळे, तेल, सरकी इत्यादी देऊन त्यांना आराम देण्यात येतो. संध्याकाळी सर्वप्रथम शेती अवजारांची पूजा करण्यात येते. बैलांना महादेवाच्या मंदिरात नेऊन प्रसाद म्हणून गुळ- खोबरं वाटण्यात येते. मंदिराच्या जवळच एखाद्या पारंपारिक जागेवर पोळा भरवण्यात येतो. गावातले सगळे लोकं आपापले बैल घेऊन तिथे जमतात आणि मग गावाचा सरपंच "पोळा फोडतात". त्यानंतर प्रत्येक बैल आधल्या दिवशी आलेल्या निमंत्रणना जाण्यास मोकळा. ज्या ठिकाणी बैल जातो तिथे बैलधारयाला मनाची बिदागी मिळते.

    हा झाला मोठा पोळा. दुसऱ्या दिवशी "लहान पोळा" भरतो. छोटे मुलं मातीचे बैल घेऊन प्रत्येक घरी जातात. आणि लहान पोळा साजरा करतात.

    काही शंका वाटली त विचारावी. तुमचा उपक्रम आवडला. बर्याच गोष्टी माहित नव्हत्या त्या कळल्या. म्हणून चांगल्या कामात थोडा हातभार लावण्याचा हा छोटासा प्रयत्न. कळावे.

    ReplyDelete
  2. पोळा फोडतात म्हणजे काय असते

    ReplyDelete