Wednesday, August 18, 2010

श्रावण अमावस्या - पिठोरी अमावस्या

हे व्रत फक्त सुवासिनी स्त्रिया करतात. या दिवशी दिवसभर उपास करुन सायंकाळी आंघोळ करुन ही पूजा करतात. यामध्ये विशेषत: चौसष्ट योगिनींची पूजा करतात. चौरंगावर सात शक्ती देवतांची स्थापना करतात त्या अश्या, ब्राह्मी, महेश्र्वरी, वैष्णवी, वाराही, कौमारी, इंद्राणी, चामुंडा. पुढे कलशावर तांदूळाने भरलेल्या ताम्हणात चौसष्ट सुपार्‍या चौसष्ट कलांचे प्रतिक म्हणून मांडतात. अशा कला ज्यांमुळे उपजिवीका होते म्हणजेच योगिनी. पूर्वी पिठाच्या मूर्ती करत, परंतु अता मात्र यांच्या चित्राचा कागद मिळतो, त्याची पूजा करतात.
                    चौसष्ट योगिनी - पूजेचे चित्र                               चौसष्ट कला
या दिवशी नैवेद्याला सर्व पिठाचेच पदार्थ करतात,म्हणून या अमावस्येला 'पिठोरी अमावस्या' म्हणतात. वरीलप्रमाणे पूजा मांडून "अखंड सौभाग्य आणि दिर्घायु पुत्र" यासाठी प्रार्थना करतात. घरातील मुलांसाठी खीरपुरीचे किंवा पुरणपोळीचे जेवण करतात.
पूजा करुन झाल्यावर पु्रणाची आरती करतात, खिरीच्या वाटीवर पुरी झाकतात नंतर पूजा करणारी स्त्री ते आपल्या खांद्यावरुन मागे नेत विचारते, "आतीत कोण?" ( अतिथी कोण?) तेव्हा घरातील मुले आपले नाव सांगुन तो नैवेद्य हातातुन घेतात. अशा प्रकारे पूजा पूर्ण करतात.
स्त्रीला सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घायुष्य, आरोग्य देणारी ही अमावस्या आहे. 
                   ज्याप्रमाणे आपली आई आपल्याला घडवते, जगात उभं राहण्यासाठी सक्षम करते. या चौसष्ट कला ज्यांमुळे उपजिवीका होते त्यांची पूजा आपली आई करते. तेपण आपल्याच दीर्घायुष्य व आरोग्यासाठी. तर मग या दिवशी 'मातृदिन' का साजरा करत नाहीत? 
तुमच्या प्रतिक्रियांची आणि याविषयाबद्दल असलेल्या अजून काही माहितीची मी वाट पहातीय...              

1 comment:

  1. तुमची पोस्ट वाचली व मला माझ्या आजीची आठवण झाली ति असताना ह्या सर्व प्रथा पाळल्या जात असायच्या आता क्वचीतच पाळल्या जातात असो कालाय तस्मै नम:

    आजच्या नवीन पीढीचे प्रतिनिढित्व करताना तुम्ही ह्या विचारांचा वारसा जपता आहात हे उल्लेखनीय,

    ReplyDelete