Tuesday, September 21, 2010

भाद्रपद - अनंत चतुर्दशी





भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. या दिवशी घरोघरी बसवलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. आपल्या लाडक्या बाप्पाची ढोल-ताशांच्या  गजरात पाठवणी केली जाते. पुणे हे गणपती विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण आहे. विविध शाळांची सांघिक कला दाखवणारी पथके, तसेच समाज प्रबोधनात्मक संदेश देणारी पथनाट्ये देखील सादर केली जातात. हे बघण्यासाठी देश-विदेशातील लोक मोठी गर्दी करतात.
तसेच अनंत म्हणजे विष्णू याची देखील पूजा करतात यालाच अनंताचे व्रत म्हणतात. यामागे ब-याच आख्यायिका सांगितल्या जातात.
पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत ब्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला.
‘कौंदण्य’ नावाच्या एका ऋषीने अनंतदेवाचा शोध घेण्यासाठी खूप परिश्रम घेतले. अखेरीस कौंदण्य ऋषींना कळले की अनंत सर्वत्र भरलेला आहे, तेव्हापासून सर्वत्र भरलेल्या या अनंताची भाद्रपद चतुर्दशीला आराधना केली जाते.
या दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने तांब्याचे कलश चौरंगावर मांडून त्यास दोन छोटे रूमाल किंवा नविन कोणतेही वस्त्र गुंडाळतात. त्यावर दर्भाचा शेष(नाग) तयार करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळिग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात. समंत्रक १४गाठी मारलेला असा तांबडा रेशमाचा दोरा बनवून त्याचीपण पूजा करतात. या दो-यास अनंत म्हणतात; त्याबरोबर अनंती देखील पूजेत ठेवली जाते. पूजा झाल्यावर तो अनंत (दोरा) घरातील पुरुष तर अनंती ही त्याच्या पत्नीने  उजव्या हातात बांधावी. त्यानंतर अनंताची कथा भक्तिभावाने ऐकतात व आरती करतात.
अनंताचे व्रत आणि १४ या आकडय़ाचे नाते खूप आगळेवेगळे आहे. पूजेमध्ये जसा १४ गाठींचा दोरा बांधला जातो, त्याप्रमाणे अनंताच्या पूजेसाठी १४ प्रकारची फुले, नैवेद्यामध्ये १४ प्रकारच्या भाज्या गुरुजींना १४ वडे-घारग्याचे वाण अशी या व्रताच्या पद्धती आहेत. अनंताच्या पूजेच्या दिवशी मेहूण(नवरा- बायको जोडीने) जेवायला बोलवून संकल्प सोडला जातो. सौभाग्यवतींची ओटी भरली जाते.
अनंत चतुर्दशी हे व्रत अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली तरच, मागून घेतात. ओळीने चौदा वर्षे हे व्रत करण्याचा प्रघात आहे, अनंताच्या पूजेचे व्रत सुख-शांती, ऐश्वर्य, सौभाग्य, समृद्धी, स्थैर्य मिळण्यासाठी करावे असा समज आहे. कित्येक ठिकाणी पिढ्यान-पिढ्या हे व्रत केले जाते.
अहंभाव सोडून परोपकाराने वागल्यास संपत्ती व सौभाग्य मिळते, असा संदेश अनंत पूजेच्या व्रतामधून दिला गेला आहे.
 आपण दहा दिवस मोठया थाटाने आपल्या बाप्पाची पूजा-अर्चना करतो. या आनंददायी उत्सवाची सांगता यादिवशी केली जाते.
आपल्या लाडक्या भक्तांना पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन देऊन, आपल्या सर्वांवर आशीर्वादाचा हात ठेऊन बाप्पा आपला निरोप घेतो.

Monday, September 13, 2010

भाद्रपद - ज्येष्ठा गौरी पूजन

व्रतवैकल्यं, सणवारांना घेऊन येणारा श्रावण जाता जाता भाद्रपदाच्या आगमनाची वार्ता देऊन जातो. श्रावण, भाद्रपद यांच्याशी स्त्रियांचं खास जिव्हाळ्याचं नातं आहे त्यातही माहेरवाशिणींच खासं. आपल्या कुटुंबाच्या सुखासमाधानासाठी, सौख्यासाठी, समृद्धीसाठी, भरभराटीसाठी विविध पूजा, व्रते, संकल्प करण्याची गृहलक्ष्मीची परंपरा आजही चालु आहे आणि हेच तर आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.
माहेरवाशिणी ज्या दिवसाची आतुरतेने वर्षभर वाट पहात असतात, तो दिवस म्हणजे ज्येष्ठा गौरी आगमनाचा. जेव्हा लक्ष्मीला माहेरपणाचं सुख अनुभवावसं वाटतं तेव्हा ती गौर म्हणून येते, अशी कहाणी सांगितली जाते. माहेर ही गोष्टच मुळात स्त्रिला अतिशय जवळची आहे. त्यामुळेच गौरींच्या आगमनाची तयारी देखील घरोघरी अगदी पारंपारीक पद्धतीने करतात.
ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते, अनुराधा नक्षत्रावर पूजन तर मूळ नक्षत्रावर विसर्जन केलं जाते. काही घरांत गौरींनाच ‘महालक्ष्मी’ असे म्हटले जाते. ज्येष्ठ नक्षत्रावर ही पूजा होते म्हणून ‘ज्येष्ठ गौरी’ असेही म्हणतात. महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठा-कनिष्ठा, सखी-पार्वती अशा जोडीने त्या घरात आणल्या जातात. खड्याच्या गौरी, मुखवट्याच्या गौरी( शाडू, माती तसेच पितळी मुखवटे), तेरड्याच्या गौरी मोठ्या सजावटीसह घरोघरी बसवतात.
काही लोकांकडे परंपरेप्रमाणे पाणवठ्यावर जाऊन पाच खडे मुक्याने( तोंडात पाणी भरुन) आणून पूजन करतात तर काही ठिकाणी पाच मडक्यांची उतरंड किंवा भात मोजण्याचं माप घेतात. त्यावर गौरीचे मुखवटे बसवतात. हे दोन मुखवटे म्हणजे पार्वती व तिची सखी. काही लोकांकडे तेरड्याची गौर असते. एक गौर तांदूळ भरलेल्या तांब्यावर, दुसरी गहू भरलेल्या तांब्यावर तर काही घरांमध्ये सुपात बसवतात. तेरड्याची रोपे मुळासकट आणली जातात कारण ही मुळे म्हणजे गौरीची पावले समजली जातात. हल्लीच्या INSTANT च्या जमान्यासाठी त्यापुर्णपणे सजवून (अगदी साडी नेसवून) READY MADE मिळतात. काही घरात नवसाने बोललेले गौरींचे बाळ देखील मांडतात. आणताना पावलांच्या रांगोळ्या, हळदी-कुंकूवा च्या सड्यावरुन वाजत-गाजत आणतात. "गौरायी आली सोन्या-मोत्याच्या पावलांनी" असे म्हणतात.

पहिल्या दिवशी तिला दुर्वा( हरळी सारखी वेली जा), कापूस( सरकी सारखी म्हातारी हो), आघाडा वाहतात आणि मेथीची भाजी- भाकरीचा नैवेद्य दाखवतात.
दुसर्‍या दिवशी तिला पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळतात, हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात तर नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबीरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो.
तिसर्‍या दिवशी तिला खीर-कानवल्याचा( करंजीचा प्रकार मुरड घालुन करतात, गौर मुरडून परत यावी म्हणून) नैवेद्य दाखवुन तिची पाठवणी (विसर्जन) करतात.
अश्याप्रकारे ही माहेरवाशीण येते, राहाते, आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पणं परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते.
स्त्रीचं मन नेहमी स्वत:च्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी, आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सणवार, व्रतवैकल्ये ती मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने व मनोभावे करते.
 अशा ह्या महालक्ष्मीला, वैभवलक्ष्मीला, वेळप्रसंगी दुर्गामाता म्हणून अवतरणार्‍या आणि गृहलक्ष्मीला कोटी कोटी प्रणाम.....!

पार्वती ही गणपती ची आई, तिलाच गौरी असेही म्हणतात. पण गौरी ह्या गणपतीच्या  पाठोपाठ येतात, त्यांना भाऊ-बहीण या नात्यात पाहिले जाते, तरी त्यांच्यातील नेमके नाते काय?

Saturday, September 11, 2010

भाद्रपद - ॠषी पंचमी

भाद्रपद शुद्ध पंचमीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी हे व्रत करतात. ज्ञान व विज्ञान तसेच पुराणे यांची दिक्षा देण्याचे काम ऋषी मुनी फार पुर्वीपासून करत होते ज्यांचा संदर्भ आजही उपयोगात आणला जातो, अशा या थोर ऋषींच्या कार्यांची कृतज्ञता व्यक्त करणे हा ह्या व्रतामागील सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे.
             कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्री हे सात ऋषी आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधती ह्यांची पुजा करतात. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षांतून किमान एक दिवस तरी स्वत:च्याच कष्टाचे अन्न खावे, हा यामागे संकेत वा संदेश आहे. ‘स्वकष्टार्जित’ या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे.         
            हे व्रत मुख्यत्वे करुन स्त्रिया रजस्वला दोष नाहीसा करण्यासाठी करतात. या व्रताने विविध तीर्थांच्या स्नानाचे, विविध प्रकारच्या ज्ञानाचे पुण्य लागते, व मोक्ष मिळतो अशी आख्यायिका आहे.
            आपल्या जीवनाच्या सर्वागीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धान्ताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण देण्यासाठी ही ऋषिपंचमी!

भाद्रपद - गणेश चतुर्थी

गौरी-गणपतीच्या निमित्ताने माहेरची आठवण यायला सुरुवात झालीये. दर वर्षी अगदी पारंपारीक पद्धतीने बसवला जाणारा गणपती कायमचा मनात घर करुन राहीलाय. माझे स्वत:चे श्रद्धास्थान म्हणजे "बाप्पा". आणि श्रद्धा अधिक वाढण्याचे विशेष कारण म्हणजे मागच्या वर्षी याच दहा दिवसात माझे लग्न ठरले आणि नविन गोड आठवणी तयार झाल्या. यावर्षी सासरी माझा पहिलाच गणेश उत्सव, आणि आठवले ते सगळे याआधीचे गणेश उत्सव..... ते असे,
आध्यात्मिक, परंपरा जपणारे आमचे बाबा यावेळी मात्र मी कसा आधुनिक विचारांचा आहे? हे दाखवुन दयायचे. तृतीयेला मूर्ति घरी आणण्यापासून ते बोटीत बसून नदीत विसर्जन करण्यापर्यंत ती मूर्ति आम्हा दोन बहिणींच्या हातात दयायचे. अभिमानाने माझी ही "दोन मुले" आहेत सांगायचे. अशा या माझ्या बाबांसाठी, त्यांनीच शिकवलेले, त्यांच्याचसाठी.... आणि तुमच्या माहितीसाठी थोडसं लिहिण्याचा प्रयत्न....
आपले आराध्य दैवत असलेल्या गणरायाची भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी स्थापना केली जाते. काही ठिकाणी गणपतीची शाडूची, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची तर अगदी चांदीची देखील मूर्ति बसवतात. ती घरी आणताना तिचा चेहरा नविन वस्त्राने झाकतात, ती आणताना चंद्राकडे पाहु नये, पाहिल्यास त्यावर्षी त्या माणसावर चोरीचा आळ येतो असं म्हणतात. यामागची पौराणिक कथा माहिती असल्यास जरुर पाठवावी. चतुर्थीला अगोदर हरतालिकेच्या पुजेचे विसर्जन करतात. नंतर गणपतीची साग्रसंगीत प्रतिष्ठापना केली जाते. त्यादिवशी गणपतीला लाल फुले ( गणपती ही बुद्धीची देवता मानली जाते, मनुष्याला जे तेज प्राप्त होते ते त्याच्या ज्ञानामुळे. ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणांची झळाळी प्रखर लाल असते त्याप्रमाणेच तेजाचा रंग देखील लाल मानला जातो. अशा या तेजस्वी देवाला लाल फुले वाहतात) कमळ, दुर्वा (इतरवेळी पायी तुडवले जाणारे गवत. दुर्वांना ३ दले असतात. ती दले बालपण, तारुण्य, वृद्धत्व यांचे प्रतिक मानली जातात.या तिनही अवस्थांमधे त्या जिवनदात्याला शरण जावे, म्हणून दुर्वा वाहिल्या जातात) केवडा, तुळस, बेल अशी विविध २१ प्रकारची पत्री वाहतात. प्रसादाला पंचामृत ( दूध, दही, साखर, मध, तूप), पंचखाद्य (खारीक, खसखस, खडीसाखर, खवा, खोबरे) व उकडीचे मोदक करतात. सकाळ, संध्यकाळी आरती, अथर्वशीर्ष याचे पठण केले जाते. खिरापतीला विविध गोड पदार्थ केले जातात. दिड, दोन, पाच, सात आणि दहा दिवसांचा गणपती प्रत्येक घराच्या प्रथे प्रमाणे बसवला जातो.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामधे सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. याकारणाने लोक एकत्र जमतात, विचारांची देवाणघेवाण देखील केली जाते. लो. टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट पूर्ण होताना दिसते.
परंतु याचे बदलेले व्यापारीक स्वरुप मात्र मुख्य उद्दिष्टापासून विचलीत करणारे आहे, नाही का?
आपले विचार, गणेशपूजे बद्दल अधिक माहिती, त्यामागच्या पौराणिक कथा, जरुर कळवा. जेणेकरुन ती सर्व माहिती आपल्याला सगळ्यांना एकाच ठिकाणी वाचता येईल.
तर मग परत भेटूयात... तुमच्या-माझ्या नविन माहिती सोबत....

Friday, September 10, 2010

सण - उत्सव यांचे अढळ स्थान

चातुर्मासाची सुरुवात झाली की सण-उत्सव यांची चाहूल लागते. तसं पाहिलं तर वर्षभर साजरे होणारे सण-उत्सव हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. त्यात श्रावण- भाद्रपद म्हणजे उत्सवांची पर्वणीच! त्यात साजरे केले जाणारे उत्सव, केली जाणारी व्रतवैकल्यं, ह्या परंपरा-प्रथा शेकडो वर्ष जपल्या गेल्या आहेत. आपला कोणताही सण-उत्सव आला की आपल्या इतक्याच उत्साहाने निसर्ग पण आपली साथ देतो. आपली संस्कृती एवढी संपन्न आहे, कि इथे परंपरेनी चालत आलेली कोणतीच प्रथा व्यर्थ म्हणता येणार नाही.
आपल्याला जर आपले आयुष्य उत्साहाने, आनंदाने जगायचे असेल तर शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. मला वाटते की, आपल्या पूर्वजांनी हे लक्षात घेऊनच  सण-उत्सव आणि आहार यांची उत्तम सांगड आपल्यासाठी अगदी आयती घालून दिली आहे. उदाहरण दयायचे झाले तर, संक्रांत ही थंडीच्या दिवसांमधे येते, त्यादिवशी तीळ-गूळ असे उष्णता वाढवणारे पदार्थ खातात. गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने खातात जेणेकरुन सहा रसांपैकी ( मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट ) एक कडू रस पोटात जाऊन कृमी अथवा जंतुंचा नाश व्हावा. श्रावण चार्तुमासातला श्रेष्ठ मास. त्यामध्ये जास्तीत जास्त व्रतवैकल्यं ही नेमाने पाळली जातात, शास्त्रानुसार या महिन्यात  कांदा-लसूण तसेच मांसाहार देखील वर्ज्य केला आहे कारण पावसाळ्यात येणारा श्रावण हा अनेक रोगांना देखील आमंत्रण देतो, तसेच पावसाळा हा पचनशक्ती  क्षीण करणारा ऋतु असल्याने ते टाळण्यासाठीच पचनास जड पदार्थ हे नेम पाळून व उपास करुन टाळले जातात.
हे सणवार-उत्सव साजरे करण्यामागे आपले पालक, कुटुंबीय, निसर्ग आणि आपल्याला घडवणारा समाज   यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा मुख्य उद्देश असतो. म्हणून आपण हे उत्सव, सण साजरे केलेच पाहिजेत त्याशिवाय,
"शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक उन्नती होणे  नाही."       ....इति आकांक्षा उवाच!

Saturday, September 4, 2010

भाद्रपद - हरतालिका पूजन

नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे 'हरतालिका' हे व्रत सर्वांत श्रेष्ठ मानले जाते. हे व्रत केल्यामुळेच पार्वतीला भगवान शंकर वर म्हणुन प्राप्त झाले, अशी कथा आहे.
भाद्रपद शुद्ध तृतीयेला मुली, सुवासिनी हे व्रत करतात. आंघोळ करुन, नदीतील वाळू आणतात. त्या वाळूची शिवलिंगे स्थापन करतात. परंतु अता बहुतेक ठिकाणी सखीसह पार्वतीच्या मातीच्या मूर्ति मिळतात. त्या स्थापून त्यांची पूजा करतात. पूजेचे ठिकाणी तोरण, केळीचे खुंट बांधतात, रांगोळी काढतात. फुले, विविध फुलाफळांच्या झाडांची पाने पत्री म्हणुन वाहतात. दिवसभर कडक (पाणी पण न पिता) उपास करतात.रात्री कहाणी व जागरण करतात. रात्री बारानंतर रुईच्या पानावर दही घालुन चाटतात. नंतर सकाळी उत्तरपूजा करुन व्रताचे विसर्जन करतात. हे व्रत केल्यामुळे स्त्रियांचे सौभाग्य वाढते, असे म्हणतात.

Monday, August 30, 2010

गोकुळअष्टमी, गोपाळकाला

श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात. दिवसभर उपास देखील करतात, संपूर्ण रात्र भजन, किर्तन यामध्ये घालवतात. दुसरा‌ दिवस असतो तो गोपाळकाल्याचा. दही, दूध, लोणी, पोहे व लाह्या एकत्र करुन मटक्यात भरतात, त्याची दहिहंडी तयार केली जाते, ती लहान बाळगोपाळांकडून फोडली जाते. अश्याप्रकारे हे दिवस अतिशय उल्हासात पार पाडतात.

आता मात्र या उत्सवाला स्पर्धा आणि एक करमणूक  असे स्वरुप मिळाले आहे, त्यामागचा धार्मिक भाव कुठेच दिसत नाही. पण त्यामगचा उद्देश मात्र आजही जपला जातो, रोजच्या कामातुन, धकाधकीतुन वेळ काढुन लोक एकत्र येतात. एकमेकांच्या विचांरांची देवाणघेवाण केली जाते आणि परत एकदा दाखवून दिले जाते, "एकी हेच बळ".

तरी गोकुळअष्टमी, गोपाळकाला, दहिहंडी या विषयांवर या व्यतिरिक्त अजून काही माहिती असल्यास पाठवावी.

श्रावणी शुक्रवार/ जिवती पूजा

सुरुवात केली ती जिवतीचा फोटो शोधायला. इंटरनेटवर खूप शोधून पण स्कॅन कॉपी मिळाली नाही. शेवटी फोटो कुरियरने मागवून घेतला आणि स्कॅन करून हया ब्लॉगवर टाकला आहे.

फोटोबद्दल थोडक्यात:
नागपंचमीच्या दिवशी नागचित्राची, चार शनिवार नरसोबाची, चार बुधवार बुधाची, चार गुरुवार बृहस्पतीची पूजा करतात.
दर शुक्रवारी जिवत्यांना कापसाचे गेजवस्त्र, दुर्वा-आघाडा यांची माळ वाहतात. पूजा करुन पुरणाचा नैवेद्य व आरती करतात. घरातील लहान मुलांना औक्षण करतात. सुवासिनी व लेकुरवाळी स्त्री सवाष्ण म्हणून बोलावतात. तिची खणा-नारळाने ओटी भरुन लक्ष्मी समान पूजा करतात. संध्याकाळी सुवासिनींना हळदीकुंकवास बोलावून दूध-साखर व फुटाणे देतात. त्याचप्रमाणे काही ठिकाणी ओला हरभरा याची खिरापत देण्याची पद्धत आहे.
ही पूजा मुलांच्या सुखरुपतेसाठी व दिर्घायुष्यासाठी करतात.

Wednesday, August 18, 2010

श्रावण अमावस्या - पिठोरी अमावस्या

हे व्रत फक्त सुवासिनी स्त्रिया करतात. या दिवशी दिवसभर उपास करुन सायंकाळी आंघोळ करुन ही पूजा करतात. यामध्ये विशेषत: चौसष्ट योगिनींची पूजा करतात. चौरंगावर सात शक्ती देवतांची स्थापना करतात त्या अश्या, ब्राह्मी, महेश्र्वरी, वैष्णवी, वाराही, कौमारी, इंद्राणी, चामुंडा. पुढे कलशावर तांदूळाने भरलेल्या ताम्हणात चौसष्ट सुपार्‍या चौसष्ट कलांचे प्रतिक म्हणून मांडतात. अशा कला ज्यांमुळे उपजिवीका होते म्हणजेच योगिनी. पूर्वी पिठाच्या मूर्ती करत, परंतु अता मात्र यांच्या चित्राचा कागद मिळतो, त्याची पूजा करतात.
                    चौसष्ट योगिनी - पूजेचे चित्र                               चौसष्ट कला
या दिवशी नैवेद्याला सर्व पिठाचेच पदार्थ करतात,म्हणून या अमावस्येला 'पिठोरी अमावस्या' म्हणतात. वरीलप्रमाणे पूजा मांडून "अखंड सौभाग्य आणि दिर्घायु पुत्र" यासाठी प्रार्थना करतात. घरातील मुलांसाठी खीरपुरीचे किंवा पुरणपोळीचे जेवण करतात.
पूजा करुन झाल्यावर पु्रणाची आरती करतात, खिरीच्या वाटीवर पुरी झाकतात नंतर पूजा करणारी स्त्री ते आपल्या खांद्यावरुन मागे नेत विचारते, "आतीत कोण?" ( अतिथी कोण?) तेव्हा घरातील मुले आपले नाव सांगुन तो नैवेद्य हातातुन घेतात. अशा प्रकारे पूजा पूर्ण करतात.
स्त्रीला सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घायुष्य, आरोग्य देणारी ही अमावस्या आहे. 
                   ज्याप्रमाणे आपली आई आपल्याला घडवते, जगात उभं राहण्यासाठी सक्षम करते. या चौसष्ट कला ज्यांमुळे उपजिवीका होते त्यांची पूजा आपली आई करते. तेपण आपल्याच दीर्घायुष्य व आरोग्यासाठी. तर मग या दिवशी 'मातृदिन' का साजरा करत नाहीत? 
तुमच्या प्रतिक्रियांची आणि याविषयाबद्दल असलेल्या अजून काही माहितीची मी वाट पहातीय...              

Tuesday, August 17, 2010

श्रावणी सोमवार - शिवामुठ, फसकी

लग्ना नंतर पहिली पाच वर्ष शिवामुठ वाहतात. श्रावण महिन्यातील दर सोमवारी एक धान्य शंकराच्या पिंडीवर वाहतात. पहिल्या सोमवारी तांदूळ, नंतर तीळ, मूग, जव आणि पाचवा आला तर सातू घेतात.
शंकराच्या पिंडीवर बेल,हातातील धान्य वाहून पुढील प्रार्थना करतात,
"शिवा शिवा, महादेवा, माझी शिवामुठ, ईश्वरादेवा, सासूसासरां, दिराभावा, नणंदजावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा !"  
 दिवसभर उपास करतात व रात्री तो मुक्याने जेवुन सोडतात.
या व्रताप्रमाणे काही ठिकाणी फसकीचे व्रत देखील करतात. ते असे, पसाभर तांदूळ घेऊन महादेवाची पूजा करतात, "जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी" असं म्हणून हातातील तांदूळ पिंडीवर वाहतात व राहीलेले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहतात. दर सोमवारी हीपण पूजा केली जाते. पाच वर्षांनी मात्र या पूजेचे उद्यापन करतात.
हल्ली प्रत्येक घरांमध्ये येणारी सून ही लाडकी आणि आवडती असतेच. आर्थिक परिस्थिती देखील चांगली असते, तरी पूर्वी पाळत असलेल्या प्रथा आजही काही घरांमध्ये नविन सूनांकडून करवुन घेतल्या जातात, असं का?
असो, या दोन्ही पूजेबद्दल अधिक माहिती असल्यास ती कळवावी.        

Monday, August 16, 2010

श्रावण - नारळीपौर्णिमा / राखी पौर्णिमा / श्रावणी पौर्णिमा

`पातळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपले भाऊ केले व नारायणाची मुक्‍तता केली. तो दिवस श्रावणपौर्णिमा होता.' म्हणून या दिवशी राखी पौर्णिमा साजरी केली जाते. ही पद्धत विशेषकरुन उत्तर हिंदुस्थानात आहे. बहिण भावाला राखी बांधते व भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.

समुद्रकिनारा असलेल्या भागांमध्ये विशेषत: कोळी समाजात या दिवशी समुद्राची पूजा करतात व त्यात नारळ सोडतात. नुकताच पावसाळा संपलेला असतो, झालेली मासेमारी जशी चांगली झाली तशीच ती पुढे चालु राहू देत. अशी प्रार्थना करतात व नारळ सोडून कृतज्ञता व्यक्त करतात, म्हणून या दिवसाला नारळीपौर्णिमा असेही म्हणतात.
यादिवशी पक्वान्न म्हणून नारळाचे विविध गोड पदार्थ करतात.

पोळा/ बैलपोळा

श्रावण वद्य अमावस्येला हा सण साजरा केला जातो. या सणाला शेतकरी लोकांमध्ये खूप महत्व आहे. शेतकरी या दिवशी बैलांना तेल लावुन आंघोळ घालतात, त्यांना सजवुन औक्षण केले जाते, दुपारी पुरणपोळीचे जेवण करुन ते बैलांना खाऊ घालतात.तसेच त्यांची वाजतगाजात मिरवणुक काढली जाते.  शेतीमध्ये बैलांची होणारी मदत अमुल्य आहे, आपल्यासाठी सदैव कष्ट करणाऱ्या या मुक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण उत्साहात साजरा केला जातो.
काही ठिकाणी बैलगाड्यांच्या शर्यती देखील आयोजित केल्या जातात. पण मला कळालेल्या माहिती मध्ये एक गोष्ट इथे नक्की सांगावी वाटते, या शर्यतींच्या वेळी बैलांना दारु पाजली जाते, जेणेकरुन ते आवेषाने पळतील. परंतु ज्याची आपण पूजा करतो त्याच्या जिवाशी केवळ बक्षिसाच्या रकमेसाठी का खेळायचं? कधी ते प्राणांवर देखील बेतु शकतं? मग दोष कोणालाही देता येणार नाही.
या बद्दल तुमच्या  प्रतिक्रिया जाणायला मला नक्की आवडेल.तर मी वाट बघतीय.....

Sunday, August 15, 2010

श्रावण - मंगळागौरी

माझी पहिलीच वेळ. मोठ्या बहिणीची झाली तेव्हा पाहीली होती. मग परत एकदा प्रश्न पडायला सुरुवात झाली.....
          मला आई-बाबा,ताई फोन वरुन माहिती, पूजेचा विधी सांगत होते. त्याप्रमाणे तयारी चालू केली. अहोंना सोबत घेऊन पूजेच सामान आणून ती उत्तम रितीने पार पाडली, ती अशी.....
चौरंगावर गौर बसवली, तिला तांदूळ-मुगाची डाळ  वाहिली, समोर वाळूची महादेवाची पिंड स्थापन केली, त्यावर वेगवेगळी पत्री वाहिली, भोवताली फुलं-पानं,रांगोळी यांची आरास केली.सोळा वाती लावुन  पुरणाची आरती केली, नंतर कहाणी वाचली. मुक्याने जेवण केले.
पण अजूनही काही प्रश्न आहेत....आणि उत्तर हवी आहेत ती तुम्हा जाणकारां कडून.....
१. ही पुजा कोणी करायची?
२. किती वर्ष  करायची?
३. तांदूळ-मुगाची डाळ का वाहतात?
४. मुक्याने का जेवतात?
५. मंगळागौर जागवणं म्हणजे काय?का जागवतात?
यापुढची पुजा करताना यापैकी एकही प्रश्न मनात नसेल याची खात्री आहे, कारण ती उत्तरं मला मिळतील...तीपण तुमच्या कडून.....

Friday, August 13, 2010

श्रावण - शिळासप्तमी / सीतला सप्तमी

या दिवशी जलदेवतांची प्रार्थना केली जाते. वंशामधील जे कोणी पाण्यात बुडाले असतील तर ते परत मिळावेत म्हणून प्रार्थना केली जाते.
याबद्दल अधिक माहिती असल्यास कृपया ती पाठवावी.

श्रावण - नागपंचमी

लहान-मोठ्या मुली व स्त्रिया यांच्यामधे हा सण उत्साहात साजरा करतात. हातावर मेंदी काढतात, बांगड्या भरतात, नविन वस्त्रे घालतात, सुना आपआपल्या माहेरी जातात. माझ्या लहानपणी गारुडी "नागोबाला दूध" अशी आरोळी देत यायचे, पण आता सरकारी बंदीमूळे सर्वजण घरीच पूजा करतात.
नागचित्राची किंवा पाटावर चंदनाचे नाग काढून त्याला दूध, साखर, ज्वारीच्या लाह्या, दुर्वा वाहतात. उकडीची पुरणाची दिंड करुन नैवेद्य दाखवतात व नमस्कार करुन म्हणतात ...
" जिथे माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथे खुशाल असोत."
या दिवशी काही कापू नये, भाज्या चिरु नये, तव्यावर भाजू नये, तळलेले खाऊ नये, जमीन खणू नये ( नागाला इजा होइल असे काही करु नये.) या चाली आजही पाळल्या जातात.

श्रावण - दिप पूजन / दिव्याची आवस

प्रश्नांना सुरवात झाली ती श्रावण महिन्यापासून.....

ही अमावस्या श्रावण महिन्यात येते की अमावस्या संपल्यावर श्रावण सुरु होतो? या दिवशी सर्व जुने-नवे दिवे एकत्र करुन त्यांची पूजा करतात, त्याच बरोबर कणकीचे किंवा बाजरीच्या रव्याचे गोड दिवे करतात.त्यात विशेष म्हणजे त्या दिवशी काही घरांमधे तवा ठेवला जात नाही. या मागचे कारण माहिती नाही. आणि या विषयी माहिती पण एवढीच. अता हवीयं माहिती तुमच्या कडून....