Monday, August 30, 2010

श्रावणी शुक्रवार/ जिवती पूजा

सुरुवात केली ती जिवतीचा फोटो शोधायला. इंटरनेटवर खूप शोधून पण स्कॅन कॉपी मिळाली नाही. शेवटी फोटो कुरियरने मागवून घेतला आणि स्कॅन करून हया ब्लॉगवर टाकला आहे.

फोटोबद्दल थोडक्यात:
नागपंचमीच्या दिवशी नागचित्राची, चार शनिवार नरसोबाची, चार बुधवार बुधाची, चार गुरुवार बृहस्पतीची पूजा करतात.
दर शुक्रवारी जिवत्यांना कापसाचे गेजवस्त्र, दुर्वा-आघाडा यांची माळ वाहतात. पूजा करुन पुरणाचा नैवेद्य व आरती करतात. घरातील लहान मुलांना औक्षण करतात. सुवासिनी व लेकुरवाळी स्त्री सवाष्ण म्हणून बोलावतात. तिची खणा-नारळाने ओटी भरुन लक्ष्मी समान पूजा करतात. संध्याकाळी सुवासिनींना हळदीकुंकवास बोलावून दूध-साखर व फुटाणे देतात. त्याचप्रमाणे काही ठिकाणी ओला हरभरा याची खिरापत देण्याची पद्धत आहे.
ही पूजा मुलांच्या सुखरुपतेसाठी व दिर्घायुष्यासाठी करतात.

9 comments:

  1. जयदेवी जयदेवी जय जिवती जननी
    सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।

    श्रावण येतांचि आणूं प्रतिमा ।
    गृहांत स्थापूनि करू पूजना ।
    आघाडा दुर्वा माळा वाहूंया ।
    अक्षता घेऊन कहाणी सांगू या ।
    जयदेवी जयदेवी जय जिवती जननी
    सुखी ठेवी संतति विनति तवचरणी । । १ । ।

    पुरणपोळीचा नैवेद्य दावूं ।
    सुवासिनींना भोजन देऊं ।
    चणे हळदीकुंकू दूधहि देऊं ।
    जमूनि आनंदे आरती गाऊं ।
    जयदेवी जयदेवी जय जिवती जननी
    सुखी ठेवी संतति विनति तवचरणी । । २ । ।

    सटवीची बाधा होई बाळांना ।
    सोडवी तींतून तूचि तयांना ।
    माता यां तुजला करिती प्रार्थना ।
    पूर्ण ही करी मनोकामना ।
    जयदेवी जयदेवी जय जिवती जननी
    सुखी ठेवी संतति विनति तवचरणी । । ३ । ।

    तुझिया कृपेने सौख्य नांदू दे ।
    वंशाचा वेल नीट वाढूं दे ।
    सेवा हे व्रत नित्य घडूं दे ।
    मनींचे हेतू पूर्ण होऊंदे ।
    जयदेवी जयदेवी जय जिवती जननी
    सुखी ठेवी संतति विनति तवचरणी । । ४ । ।

    श्रावणी शुक्रवार व जिवती पुजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे.
    श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची अराधना करून सुवासिनींना भोजन व हळदी-कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षीणा देऊन सत्कार केला जातो. ह्या विधीस "सवाष्ण करणे" म्हणतात.

    श्रावण महीन्यात चारी शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनींना हळदी- कुंकवाला बोलवून त्यांना दुध्-साखर चणे-फुटाणे द्यावेत.प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालावे व कोणत्याही एका शुक्रवारे पुरण्पोळी करून सवाष्ण जेवावयास घालावी. तिला दक्षीणा द्यावी.

    श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवतीची पुजा करतात. ही पुजा संततीरक्षणार्थ मानली जाते.
    जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार (उदा. मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार) येईल त्या दिवशी देव्हार्याजवळ भिंतीवर लावावा. त्याची पुजा आठवड्यातून चार दिवस करावी.

    श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीमातेची तसेच जिवतीची पुजा करावी.
    फुले, आघाडा व दुर्वा ह्यांची एकत्र करून केलेली माळ, हळद्-कुंकू लावलेले २१ मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र, गंध, हळदि-कुंकू, अक्षता लावून जिवतीची पुजा करावी.
    पुरणाचे ५ / ७ / ९ असे दिवे करून लक्ष्मीमातेची व जिवतीची आरती करावी. विड्यांच्या पानांबरोबर सुपारी वफळ ठेवून दुध्-साखरेचा व चणे-फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा.

    त्या दिवशी स्वयपाकांत मुख्य म्हणजे पुरण घालतात. बाकी स्वयंपाक वरण्-भात्-तूप, लिंबू, भाजी, पुरण, खीर, चटणी, कोशिंबीर, तळण, वाटली डाळ, आमटी ई. करावा.
    ह्या दिवशी मुलांना वाण म्हणून "आरत्या" किंवा" मुरण्या" देतात त्या कराव्या.
    ( आरत्या- कणकेत गुळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकेरीत तळलेया पुर्या.
    मुरण्या- पिकलेल्या केळ्यात रवा गुळ खोबरे घालून छोटे छोते तळलेले गोळे.)

    देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा.
    सवाष्णीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी.
    जेवावयास बसण्यापुर्वी पानापुढे विडा दक्षीणा ठेवून नमस्कार करावा. जेवण झाल्यावर सवाष्णीची खणा-नारळाने ओटी भरावी.

    जिवतीची पुजा करून तिला औक्षण करून तिची आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना पण औक्षण करावे.
    कुंकू अक्षता लावून चणे साखर फुटाण्याचे व आरत्यामुरण्यांचे वाण देऊन, निरांजनात ५ वाती (तेलवाती घ्याव्या फुलवाती असू नये) ठेऊन त्याने औक्शण करावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, व दिर्घायुश्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी.
    परगावी जर मुलं असतील तर चारी दिशेला औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्या सारखे होईल.

    त्या दिवशी देविची ओटी भरतात.

    श्रावणात नाग्-नरसोबाचे पुजन घरोघरी केले जाते. बुधवारी बुधाची व गुरुवारी ब्रहस्पतीची पुजा करतात.
    प्रत्येक शनिवारी नृसिंहाची पुजा करतात. हळदि कुंकू, वस्त्र, विड्याच्या पानाची माळ नृसिंहाच्या फोटोला घालून तांदळाचे तिखट वडे करून नैवेद्य दाखवतात. जिवतीची जशी दिव्याची आरती करतात तशी ७ वडे ताम्हणात ठेऊन त्यावर फुलवाती ठेवून त्याने आरती करतात.
    ह्या दिवशी मारुतीची उपासना करायची तसेच एका विद्यार्थ्याला जेऊ घालायची पद्धत आहे.


    नागचतुर्थीला पाटावर चंदनाने पांच फण्याचे नागाचे चित्र करून त्याची पुजा करतात. त्यावेळी दुध व लाह्याचा प्रसाद असतो व दुसर्या दिवशी नागपंचमीला उपास सोडतात. पुरणाचे दिंडे किंवा गुळ खोबर्याच्या पतोळ्याचा नैवेद्य करून बाकी सणांप्रमाणेच स्वयंपाक करावा. त्या दिवशी विळीने चिरत नाहीत व तळणही करत नाहीत.

    श्रावण महीना संपेपर्यंत ही वस्त्रे, माळा फोटोवरून काढत नाहीत.
    जिवतीचा कागद, गौरी-गणपती विसर्जनानंतर हळद्-कुंकू अक्षता वाहून काढावा व माळा, फुले निर्माल्य सोडावे.

    ReplyDelete
  2. जिवतीचा Single फोटो या लिंकवर ठेवला आहे. गरजूंनी download करून Colour print काढून laminate करून ठेवावा. श्रावण महिन्यात पूजे साठी उपयोग होईल.


    https://lh5.googleusercontent.com/-TPWZWMjAQFs/UAZ3ksgIGSI/AAAAAAAABFE/Z6CTorMnPno/s628/jivati+photo+4.JPG

    ReplyDelete
  3. https://plus.google.com/photos/106292330828414470671/albums/5766165469623376689

    ReplyDelete
  4. फोटो साठी thank you..!!

    ReplyDelete
  5. फोटो साठी thank you..!!

    ReplyDelete
  6. खूप छान लेख आणि फोटो साठी खूप धन्यवाद. कॅनडा मधे पण मला पूजा करता आली.

    ReplyDelete