Tuesday, September 21, 2010

भाद्रपद - अनंत चतुर्दशी





भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. या दिवशी घरोघरी बसवलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. आपल्या लाडक्या बाप्पाची ढोल-ताशांच्या  गजरात पाठवणी केली जाते. पुणे हे गणपती विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण आहे. विविध शाळांची सांघिक कला दाखवणारी पथके, तसेच समाज प्रबोधनात्मक संदेश देणारी पथनाट्ये देखील सादर केली जातात. हे बघण्यासाठी देश-विदेशातील लोक मोठी गर्दी करतात.
तसेच अनंत म्हणजे विष्णू याची देखील पूजा करतात यालाच अनंताचे व्रत म्हणतात. यामागे ब-याच आख्यायिका सांगितल्या जातात.
पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत ब्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला.
‘कौंदण्य’ नावाच्या एका ऋषीने अनंतदेवाचा शोध घेण्यासाठी खूप परिश्रम घेतले. अखेरीस कौंदण्य ऋषींना कळले की अनंत सर्वत्र भरलेला आहे, तेव्हापासून सर्वत्र भरलेल्या या अनंताची भाद्रपद चतुर्दशीला आराधना केली जाते.
या दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने तांब्याचे कलश चौरंगावर मांडून त्यास दोन छोटे रूमाल किंवा नविन कोणतेही वस्त्र गुंडाळतात. त्यावर दर्भाचा शेष(नाग) तयार करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळिग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात. समंत्रक १४गाठी मारलेला असा तांबडा रेशमाचा दोरा बनवून त्याचीपण पूजा करतात. या दो-यास अनंत म्हणतात; त्याबरोबर अनंती देखील पूजेत ठेवली जाते. पूजा झाल्यावर तो अनंत (दोरा) घरातील पुरुष तर अनंती ही त्याच्या पत्नीने  उजव्या हातात बांधावी. त्यानंतर अनंताची कथा भक्तिभावाने ऐकतात व आरती करतात.
अनंताचे व्रत आणि १४ या आकडय़ाचे नाते खूप आगळेवेगळे आहे. पूजेमध्ये जसा १४ गाठींचा दोरा बांधला जातो, त्याप्रमाणे अनंताच्या पूजेसाठी १४ प्रकारची फुले, नैवेद्यामध्ये १४ प्रकारच्या भाज्या गुरुजींना १४ वडे-घारग्याचे वाण अशी या व्रताच्या पद्धती आहेत. अनंताच्या पूजेच्या दिवशी मेहूण(नवरा- बायको जोडीने) जेवायला बोलवून संकल्प सोडला जातो. सौभाग्यवतींची ओटी भरली जाते.
अनंत चतुर्दशी हे व्रत अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली तरच, मागून घेतात. ओळीने चौदा वर्षे हे व्रत करण्याचा प्रघात आहे, अनंताच्या पूजेचे व्रत सुख-शांती, ऐश्वर्य, सौभाग्य, समृद्धी, स्थैर्य मिळण्यासाठी करावे असा समज आहे. कित्येक ठिकाणी पिढ्यान-पिढ्या हे व्रत केले जाते.
अहंभाव सोडून परोपकाराने वागल्यास संपत्ती व सौभाग्य मिळते, असा संदेश अनंत पूजेच्या व्रतामधून दिला गेला आहे.
 आपण दहा दिवस मोठया थाटाने आपल्या बाप्पाची पूजा-अर्चना करतो. या आनंददायी उत्सवाची सांगता यादिवशी केली जाते.
आपल्या लाडक्या भक्तांना पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन देऊन, आपल्या सर्वांवर आशीर्वादाचा हात ठेऊन बाप्पा आपला निरोप घेतो.

Monday, September 13, 2010

भाद्रपद - ज्येष्ठा गौरी पूजन

व्रतवैकल्यं, सणवारांना घेऊन येणारा श्रावण जाता जाता भाद्रपदाच्या आगमनाची वार्ता देऊन जातो. श्रावण, भाद्रपद यांच्याशी स्त्रियांचं खास जिव्हाळ्याचं नातं आहे त्यातही माहेरवाशिणींच खासं. आपल्या कुटुंबाच्या सुखासमाधानासाठी, सौख्यासाठी, समृद्धीसाठी, भरभराटीसाठी विविध पूजा, व्रते, संकल्प करण्याची गृहलक्ष्मीची परंपरा आजही चालु आहे आणि हेच तर आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.
माहेरवाशिणी ज्या दिवसाची आतुरतेने वर्षभर वाट पहात असतात, तो दिवस म्हणजे ज्येष्ठा गौरी आगमनाचा. जेव्हा लक्ष्मीला माहेरपणाचं सुख अनुभवावसं वाटतं तेव्हा ती गौर म्हणून येते, अशी कहाणी सांगितली जाते. माहेर ही गोष्टच मुळात स्त्रिला अतिशय जवळची आहे. त्यामुळेच गौरींच्या आगमनाची तयारी देखील घरोघरी अगदी पारंपारीक पद्धतीने करतात.
ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते, अनुराधा नक्षत्रावर पूजन तर मूळ नक्षत्रावर विसर्जन केलं जाते. काही घरांत गौरींनाच ‘महालक्ष्मी’ असे म्हटले जाते. ज्येष्ठ नक्षत्रावर ही पूजा होते म्हणून ‘ज्येष्ठ गौरी’ असेही म्हणतात. महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठा-कनिष्ठा, सखी-पार्वती अशा जोडीने त्या घरात आणल्या जातात. खड्याच्या गौरी, मुखवट्याच्या गौरी( शाडू, माती तसेच पितळी मुखवटे), तेरड्याच्या गौरी मोठ्या सजावटीसह घरोघरी बसवतात.
काही लोकांकडे परंपरेप्रमाणे पाणवठ्यावर जाऊन पाच खडे मुक्याने( तोंडात पाणी भरुन) आणून पूजन करतात तर काही ठिकाणी पाच मडक्यांची उतरंड किंवा भात मोजण्याचं माप घेतात. त्यावर गौरीचे मुखवटे बसवतात. हे दोन मुखवटे म्हणजे पार्वती व तिची सखी. काही लोकांकडे तेरड्याची गौर असते. एक गौर तांदूळ भरलेल्या तांब्यावर, दुसरी गहू भरलेल्या तांब्यावर तर काही घरांमध्ये सुपात बसवतात. तेरड्याची रोपे मुळासकट आणली जातात कारण ही मुळे म्हणजे गौरीची पावले समजली जातात. हल्लीच्या INSTANT च्या जमान्यासाठी त्यापुर्णपणे सजवून (अगदी साडी नेसवून) READY MADE मिळतात. काही घरात नवसाने बोललेले गौरींचे बाळ देखील मांडतात. आणताना पावलांच्या रांगोळ्या, हळदी-कुंकूवा च्या सड्यावरुन वाजत-गाजत आणतात. "गौरायी आली सोन्या-मोत्याच्या पावलांनी" असे म्हणतात.

पहिल्या दिवशी तिला दुर्वा( हरळी सारखी वेली जा), कापूस( सरकी सारखी म्हातारी हो), आघाडा वाहतात आणि मेथीची भाजी- भाकरीचा नैवेद्य दाखवतात.
दुसर्‍या दिवशी तिला पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळतात, हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात तर नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबीरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो.
तिसर्‍या दिवशी तिला खीर-कानवल्याचा( करंजीचा प्रकार मुरड घालुन करतात, गौर मुरडून परत यावी म्हणून) नैवेद्य दाखवुन तिची पाठवणी (विसर्जन) करतात.
अश्याप्रकारे ही माहेरवाशीण येते, राहाते, आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पणं परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते.
स्त्रीचं मन नेहमी स्वत:च्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी, आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सणवार, व्रतवैकल्ये ती मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने व मनोभावे करते.
 अशा ह्या महालक्ष्मीला, वैभवलक्ष्मीला, वेळप्रसंगी दुर्गामाता म्हणून अवतरणार्‍या आणि गृहलक्ष्मीला कोटी कोटी प्रणाम.....!

पार्वती ही गणपती ची आई, तिलाच गौरी असेही म्हणतात. पण गौरी ह्या गणपतीच्या  पाठोपाठ येतात, त्यांना भाऊ-बहीण या नात्यात पाहिले जाते, तरी त्यांच्यातील नेमके नाते काय?

Saturday, September 11, 2010

भाद्रपद - ॠषी पंचमी

भाद्रपद शुद्ध पंचमीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी हे व्रत करतात. ज्ञान व विज्ञान तसेच पुराणे यांची दिक्षा देण्याचे काम ऋषी मुनी फार पुर्वीपासून करत होते ज्यांचा संदर्भ आजही उपयोगात आणला जातो, अशा या थोर ऋषींच्या कार्यांची कृतज्ञता व्यक्त करणे हा ह्या व्रतामागील सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे.
             कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्री हे सात ऋषी आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधती ह्यांची पुजा करतात. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षांतून किमान एक दिवस तरी स्वत:च्याच कष्टाचे अन्न खावे, हा यामागे संकेत वा संदेश आहे. ‘स्वकष्टार्जित’ या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे.         
            हे व्रत मुख्यत्वे करुन स्त्रिया रजस्वला दोष नाहीसा करण्यासाठी करतात. या व्रताने विविध तीर्थांच्या स्नानाचे, विविध प्रकारच्या ज्ञानाचे पुण्य लागते, व मोक्ष मिळतो अशी आख्यायिका आहे.
            आपल्या जीवनाच्या सर्वागीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धान्ताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण देण्यासाठी ही ऋषिपंचमी!

भाद्रपद - गणेश चतुर्थी

गौरी-गणपतीच्या निमित्ताने माहेरची आठवण यायला सुरुवात झालीये. दर वर्षी अगदी पारंपारीक पद्धतीने बसवला जाणारा गणपती कायमचा मनात घर करुन राहीलाय. माझे स्वत:चे श्रद्धास्थान म्हणजे "बाप्पा". आणि श्रद्धा अधिक वाढण्याचे विशेष कारण म्हणजे मागच्या वर्षी याच दहा दिवसात माझे लग्न ठरले आणि नविन गोड आठवणी तयार झाल्या. यावर्षी सासरी माझा पहिलाच गणेश उत्सव, आणि आठवले ते सगळे याआधीचे गणेश उत्सव..... ते असे,
आध्यात्मिक, परंपरा जपणारे आमचे बाबा यावेळी मात्र मी कसा आधुनिक विचारांचा आहे? हे दाखवुन दयायचे. तृतीयेला मूर्ति घरी आणण्यापासून ते बोटीत बसून नदीत विसर्जन करण्यापर्यंत ती मूर्ति आम्हा दोन बहिणींच्या हातात दयायचे. अभिमानाने माझी ही "दोन मुले" आहेत सांगायचे. अशा या माझ्या बाबांसाठी, त्यांनीच शिकवलेले, त्यांच्याचसाठी.... आणि तुमच्या माहितीसाठी थोडसं लिहिण्याचा प्रयत्न....
आपले आराध्य दैवत असलेल्या गणरायाची भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी स्थापना केली जाते. काही ठिकाणी गणपतीची शाडूची, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची तर अगदी चांदीची देखील मूर्ति बसवतात. ती घरी आणताना तिचा चेहरा नविन वस्त्राने झाकतात, ती आणताना चंद्राकडे पाहु नये, पाहिल्यास त्यावर्षी त्या माणसावर चोरीचा आळ येतो असं म्हणतात. यामागची पौराणिक कथा माहिती असल्यास जरुर पाठवावी. चतुर्थीला अगोदर हरतालिकेच्या पुजेचे विसर्जन करतात. नंतर गणपतीची साग्रसंगीत प्रतिष्ठापना केली जाते. त्यादिवशी गणपतीला लाल फुले ( गणपती ही बुद्धीची देवता मानली जाते, मनुष्याला जे तेज प्राप्त होते ते त्याच्या ज्ञानामुळे. ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणांची झळाळी प्रखर लाल असते त्याप्रमाणेच तेजाचा रंग देखील लाल मानला जातो. अशा या तेजस्वी देवाला लाल फुले वाहतात) कमळ, दुर्वा (इतरवेळी पायी तुडवले जाणारे गवत. दुर्वांना ३ दले असतात. ती दले बालपण, तारुण्य, वृद्धत्व यांचे प्रतिक मानली जातात.या तिनही अवस्थांमधे त्या जिवनदात्याला शरण जावे, म्हणून दुर्वा वाहिल्या जातात) केवडा, तुळस, बेल अशी विविध २१ प्रकारची पत्री वाहतात. प्रसादाला पंचामृत ( दूध, दही, साखर, मध, तूप), पंचखाद्य (खारीक, खसखस, खडीसाखर, खवा, खोबरे) व उकडीचे मोदक करतात. सकाळ, संध्यकाळी आरती, अथर्वशीर्ष याचे पठण केले जाते. खिरापतीला विविध गोड पदार्थ केले जातात. दिड, दोन, पाच, सात आणि दहा दिवसांचा गणपती प्रत्येक घराच्या प्रथे प्रमाणे बसवला जातो.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामधे सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. याकारणाने लोक एकत्र जमतात, विचारांची देवाणघेवाण देखील केली जाते. लो. टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट पूर्ण होताना दिसते.
परंतु याचे बदलेले व्यापारीक स्वरुप मात्र मुख्य उद्दिष्टापासून विचलीत करणारे आहे, नाही का?
आपले विचार, गणेशपूजे बद्दल अधिक माहिती, त्यामागच्या पौराणिक कथा, जरुर कळवा. जेणेकरुन ती सर्व माहिती आपल्याला सगळ्यांना एकाच ठिकाणी वाचता येईल.
तर मग परत भेटूयात... तुमच्या-माझ्या नविन माहिती सोबत....

Friday, September 10, 2010

सण - उत्सव यांचे अढळ स्थान

चातुर्मासाची सुरुवात झाली की सण-उत्सव यांची चाहूल लागते. तसं पाहिलं तर वर्षभर साजरे होणारे सण-उत्सव हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. त्यात श्रावण- भाद्रपद म्हणजे उत्सवांची पर्वणीच! त्यात साजरे केले जाणारे उत्सव, केली जाणारी व्रतवैकल्यं, ह्या परंपरा-प्रथा शेकडो वर्ष जपल्या गेल्या आहेत. आपला कोणताही सण-उत्सव आला की आपल्या इतक्याच उत्साहाने निसर्ग पण आपली साथ देतो. आपली संस्कृती एवढी संपन्न आहे, कि इथे परंपरेनी चालत आलेली कोणतीच प्रथा व्यर्थ म्हणता येणार नाही.
आपल्याला जर आपले आयुष्य उत्साहाने, आनंदाने जगायचे असेल तर शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. मला वाटते की, आपल्या पूर्वजांनी हे लक्षात घेऊनच  सण-उत्सव आणि आहार यांची उत्तम सांगड आपल्यासाठी अगदी आयती घालून दिली आहे. उदाहरण दयायचे झाले तर, संक्रांत ही थंडीच्या दिवसांमधे येते, त्यादिवशी तीळ-गूळ असे उष्णता वाढवणारे पदार्थ खातात. गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने खातात जेणेकरुन सहा रसांपैकी ( मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट ) एक कडू रस पोटात जाऊन कृमी अथवा जंतुंचा नाश व्हावा. श्रावण चार्तुमासातला श्रेष्ठ मास. त्यामध्ये जास्तीत जास्त व्रतवैकल्यं ही नेमाने पाळली जातात, शास्त्रानुसार या महिन्यात  कांदा-लसूण तसेच मांसाहार देखील वर्ज्य केला आहे कारण पावसाळ्यात येणारा श्रावण हा अनेक रोगांना देखील आमंत्रण देतो, तसेच पावसाळा हा पचनशक्ती  क्षीण करणारा ऋतु असल्याने ते टाळण्यासाठीच पचनास जड पदार्थ हे नेम पाळून व उपास करुन टाळले जातात.
हे सणवार-उत्सव साजरे करण्यामागे आपले पालक, कुटुंबीय, निसर्ग आणि आपल्याला घडवणारा समाज   यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा मुख्य उद्देश असतो. म्हणून आपण हे उत्सव, सण साजरे केलेच पाहिजेत त्याशिवाय,
"शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक उन्नती होणे  नाही."       ....इति आकांक्षा उवाच!

Saturday, September 4, 2010

भाद्रपद - हरतालिका पूजन

नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे 'हरतालिका' हे व्रत सर्वांत श्रेष्ठ मानले जाते. हे व्रत केल्यामुळेच पार्वतीला भगवान शंकर वर म्हणुन प्राप्त झाले, अशी कथा आहे.
भाद्रपद शुद्ध तृतीयेला मुली, सुवासिनी हे व्रत करतात. आंघोळ करुन, नदीतील वाळू आणतात. त्या वाळूची शिवलिंगे स्थापन करतात. परंतु अता बहुतेक ठिकाणी सखीसह पार्वतीच्या मातीच्या मूर्ति मिळतात. त्या स्थापून त्यांची पूजा करतात. पूजेचे ठिकाणी तोरण, केळीचे खुंट बांधतात, रांगोळी काढतात. फुले, विविध फुलाफळांच्या झाडांची पाने पत्री म्हणुन वाहतात. दिवसभर कडक (पाणी पण न पिता) उपास करतात.रात्री कहाणी व जागरण करतात. रात्री बारानंतर रुईच्या पानावर दही घालुन चाटतात. नंतर सकाळी उत्तरपूजा करुन व्रताचे विसर्जन करतात. हे व्रत केल्यामुळे स्त्रियांचे सौभाग्य वाढते, असे म्हणतात.