Tuesday, September 21, 2010

भाद्रपद - अनंत चतुर्दशी





भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. या दिवशी घरोघरी बसवलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. आपल्या लाडक्या बाप्पाची ढोल-ताशांच्या  गजरात पाठवणी केली जाते. पुणे हे गणपती विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण आहे. विविध शाळांची सांघिक कला दाखवणारी पथके, तसेच समाज प्रबोधनात्मक संदेश देणारी पथनाट्ये देखील सादर केली जातात. हे बघण्यासाठी देश-विदेशातील लोक मोठी गर्दी करतात.
तसेच अनंत म्हणजे विष्णू याची देखील पूजा करतात यालाच अनंताचे व्रत म्हणतात. यामागे ब-याच आख्यायिका सांगितल्या जातात.
पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत ब्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला.
‘कौंदण्य’ नावाच्या एका ऋषीने अनंतदेवाचा शोध घेण्यासाठी खूप परिश्रम घेतले. अखेरीस कौंदण्य ऋषींना कळले की अनंत सर्वत्र भरलेला आहे, तेव्हापासून सर्वत्र भरलेल्या या अनंताची भाद्रपद चतुर्दशीला आराधना केली जाते.
या दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने तांब्याचे कलश चौरंगावर मांडून त्यास दोन छोटे रूमाल किंवा नविन कोणतेही वस्त्र गुंडाळतात. त्यावर दर्भाचा शेष(नाग) तयार करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळिग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात. समंत्रक १४गाठी मारलेला असा तांबडा रेशमाचा दोरा बनवून त्याचीपण पूजा करतात. या दो-यास अनंत म्हणतात; त्याबरोबर अनंती देखील पूजेत ठेवली जाते. पूजा झाल्यावर तो अनंत (दोरा) घरातील पुरुष तर अनंती ही त्याच्या पत्नीने  उजव्या हातात बांधावी. त्यानंतर अनंताची कथा भक्तिभावाने ऐकतात व आरती करतात.
अनंताचे व्रत आणि १४ या आकडय़ाचे नाते खूप आगळेवेगळे आहे. पूजेमध्ये जसा १४ गाठींचा दोरा बांधला जातो, त्याप्रमाणे अनंताच्या पूजेसाठी १४ प्रकारची फुले, नैवेद्यामध्ये १४ प्रकारच्या भाज्या गुरुजींना १४ वडे-घारग्याचे वाण अशी या व्रताच्या पद्धती आहेत. अनंताच्या पूजेच्या दिवशी मेहूण(नवरा- बायको जोडीने) जेवायला बोलवून संकल्प सोडला जातो. सौभाग्यवतींची ओटी भरली जाते.
अनंत चतुर्दशी हे व्रत अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली तरच, मागून घेतात. ओळीने चौदा वर्षे हे व्रत करण्याचा प्रघात आहे, अनंताच्या पूजेचे व्रत सुख-शांती, ऐश्वर्य, सौभाग्य, समृद्धी, स्थैर्य मिळण्यासाठी करावे असा समज आहे. कित्येक ठिकाणी पिढ्यान-पिढ्या हे व्रत केले जाते.
अहंभाव सोडून परोपकाराने वागल्यास संपत्ती व सौभाग्य मिळते, असा संदेश अनंत पूजेच्या व्रतामधून दिला गेला आहे.
 आपण दहा दिवस मोठया थाटाने आपल्या बाप्पाची पूजा-अर्चना करतो. या आनंददायी उत्सवाची सांगता यादिवशी केली जाते.
आपल्या लाडक्या भक्तांना पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन देऊन, आपल्या सर्वांवर आशीर्वादाचा हात ठेऊन बाप्पा आपला निरोप घेतो.

4 comments:

  1. अनंत चतुर्दशी तशी नेहमी दरवर्शि साजरी होतेच. पण आज पहील्यांदा त्या दीवसाची सांस्कुतीक माहीती आपल्या लेखातुन मिळाली.
    छान लिहला आहे.

    ReplyDelete
  2. आकांक्षा ताई,
    "आपल्याच" मराठी सणांची माहिती त्या त्या वेळी दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.हे म्हणजे आपली स्वतःचीच ओळख आपल्याला पुन्हा नव्याने झाल्या सारखे वाटते.सर्व सणांची सविस्तर माहिती नंतर निवांत पणे एकदा वाचून काढतोच.आपणास आपल्या पुढील सर्व सणांसाठी शुभेच्छा.

    ReplyDelete
  3. सगळे पोस्ट्स छान आहेत. चांगली माहिती मिळाली. लिहित राहावे आणि अशीच माहिती मिळत राहावी अशी इच्छा. धन्यवाद !

    ReplyDelete
  4. Anantachi pooja kartana jo darbhacha shesh pujla jato to nemka kay asto kalu shakel ka?

    ReplyDelete