आपल्याला जर आपले आयुष्य उत्साहाने, आनंदाने जगायचे असेल तर शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. मला वाटते की, आपल्या पूर्वजांनी हे लक्षात घेऊनच सण-उत्सव आणि आहार यांची उत्तम सांगड आपल्यासाठी अगदी आयती घालून दिली आहे. उदाहरण दयायचे झाले तर, संक्रांत ही थंडीच्या दिवसांमधे येते, त्यादिवशी तीळ-गूळ असे उष्णता वाढवणारे पदार्थ खातात. गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने खातात जेणेकरुन सहा रसांपैकी ( मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट ) एक कडू रस पोटात जाऊन कृमी अथवा जंतुंचा नाश व्हावा. श्रावण चार्तुमासातला श्रेष्ठ मास. त्यामध्ये जास्तीत जास्त व्रतवैकल्यं ही नेमाने पाळली जातात, शास्त्रानुसार या महिन्यात कांदा-लसूण तसेच मांसाहार देखील वर्ज्य केला आहे कारण पावसाळ्यात येणारा श्रावण हा अनेक रोगांना देखील आमंत्रण देतो, तसेच पावसाळा हा पचनशक्ती क्षीण करणारा ऋतु असल्याने ते टाळण्यासाठीच पचनास जड पदार्थ हे नेम पाळून व उपास करुन टाळले जातात.
हे सणवार-उत्सव साजरे करण्यामागे आपले पालक, कुटुंबीय, निसर्ग आणि आपल्याला घडवणारा समाज यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा मुख्य उद्देश असतो. म्हणून आपण हे उत्सव, सण साजरे केलेच पाहिजेत त्याशिवाय,
"शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक उन्नती होणे नाही." ....इति आकांक्षा उवाच!
No comments:
Post a Comment